मुंबई,दि.४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठ्यांचा इतिहास सांगत मराठा समाजाचे कौतुक केले आहे. मराठी आणि हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच फडणवीस यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती.
फडणवीस म्हणाले की, निशिकांत दुबे पटक पटक के मारेंगे आणि राज ठाकरे डुबा डुबा के मारेंगे या दोघांशीही आमचा संबंध नाही. जो कुणी मुंबईत येईल त्याचे आम्ही स्वागत करू. मराठी माणूस संकुचित विचार करणारा नाही. मराठी भाषेसाठी सामान्य मराठी माणूस आग्रही आहे परंतु कुणावर हिंसा करणारा मराठी माणूस नाही. मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठ्यांनी केवळ महाराष्ट्र आणि मराठीसाठी… | Devendra Fadnavis On Maratha
निशिकांत दुबे यांचे पूर्ण विधान मी ऐकले नाही. परंतु त्यांनी मराठी माणसांबाबत काही म्हटले असेल तर ते चुकीचे आहे. आपण इतके संकुचित का होतोय? मराठी माणसांची संस्कृती, आपला इतिहास काय आहे, मराठ्यांनी केवळ महाराष्ट्र आणि मराठीसाठी लढाई केली नाही तर देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानीपतची लढाई का लढली, अहमद शाह अब्दालीने पंजाब, बलुचिस्तान मला द्या, बाकीचा प्रांत तुम्ही ठेवा असं सांगितले. मराठ्यांना वाटलं असते तर त्यांनी अब्दालीसोबत समझौता केला असता परंतु एक इंचही जमीन आम्ही देणार नाही. तिथे पानीपतला जाऊन मराठे लढले, लाखो मृत पावले. १० वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. तिथे भगवा झेंडा फडकावला. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठी माणूस इतका संकुचित असू शकत नाही. हे जे चाललंय ते राजकारण आहे असा आरोपही भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.








