Devendra Fadnavis On Love Jihad: लव्ह जिहाद प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0

मुंबई,दि.३: Devendra Fadnavis On Love Jihad: लव्ह जिहाद प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच लव्ह जिहादविरोधातील कायद्याची मागणीही होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि लव्ह जिहादबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. “दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा,” असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते शनिवारी (३ जून) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

बेपत्ता महिला आणि लव्ह जिहाद…

बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही खूप संवेदनशील आहोत. आकडे पाहिले तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात या महिलांचा शोध घेण्याचं प्रमाण ९० टक्के आहे. काही ठिकाणी तर हे प्रमाण ९५ टक्के आहे. असं असलं तरी यात अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे.”

दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर…

“दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसला पाहिजे. मात्र, सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासनं देऊन लग्नं केली जात आहेत. ज्या लोकांचं आधीच लग्न झालं आहे ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत, असं दिसत आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग

“राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग आहे. आम्ही यावर कायदा तयार करण्याचा विचार करत आहोत. आम्ही सध्या वेगवेगळ्या राज्यातील कायद्यांचा अभ्यास करत आहोत,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

बालतस्करीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गृहखातं बालतस्करीच्या प्रश्नावर संवेदनशील आहे. आम्ही सातत्याने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. महाराष्ट्राने बालतस्करीवर जेवढी कारवाई केली तेवढी कुठेही झालेली नाही. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार रोखण्याचं काम राज्य सरकार करत आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here