मुंबई,दि.6: मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर गुरुवारी (दि.5) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा दिमाखदारपणे पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले.
लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना महिन्याला 1500 रूपये देण्यात येतात. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत मिळणारी रक्कम 2100 रूपये केली जाईल असे जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणावरही अन्याय केला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
त्यांनी या योजनेतील मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी (एप्रिल) केला जाईल, लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.