देवेंद्र फडणवीस यांचे एकनाथ शिंदे गटातील खासदारांबाबत मोठं विधानं

0

मुंबई,दि.7: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे गटातील खासदारांबाबत मोठं विधानं केलं आहे. शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा नाव न घेता टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर होईल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयानं मंत्रीमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलं नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नसल्याचे फडणवीस म्हणाले. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यासंबंधी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, कोण काय म्हणतंय याला काही महत्व नाही. त्यावर उत्तरं द्यायला मी काही रिकामटेकडा नाही. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व असते असे फडणवीस म्हणाले.

भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ 16 मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विशेष लक्ष असलेल्या 16 मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील मतदारसंघ होता. पण जे लोक आता युतीत आमच्यासोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुळं जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमची शक्ती त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ज्यावेळी तुम्ही सत्तेत असता त्यावेळी तुम्ही मराठवाडा, कोकण, विदर्भासाठी काय केलं याच्या आधारवर जनता मूल्यमापन करत असते. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावं आम्ही आमच्या पक्षाचं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला राज्यातील जनतेनं कौल दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

मंत्रालयाचे सचिवालय झाले असल्याची टीका होत आहे. याबाबत फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, माहिती असतानाही राजकाराणासाठी अशी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्येही देखील सचिवांना काही अधिकार दिले होते. तसेच आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना काही अधिकार दिले होते असे फडणवीस म्हणाले. ही महाराष्ट्रात नाही तर देशात परंपरा असल्याचं त्यांनी सांगितले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यामुळं त्यांना हे विसरावे लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here