“निवडणुकीत भाजपाचा विजय निश्‍चित आहे, असे समजून…” देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.1: भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.31 डिसेंबर) प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना गाफील राहू नका असा सल्ला दिला. कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

फडणवीसांनी विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

या निवडणुकीत जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा लागेल. जेणेकरून अधिकाधिक लोक भाजपच्या विचारसरणीशी जोडले जातील. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका हलक्यात घेण्याची गरज नाही, असा सल्ला फडणवीसांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे.

दबावतंत्र वापरल्यास उमेदवारी नाही?

निवडणुकीत उमेदवार निवडीतही प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जाण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांनी कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र वापरल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

त्यामुळे उमेदवार जाहीर होण्याची वाट न बघता 31 जानेवारीपर्यंत लोकसभा तर 14 फेब्रुवारीपर्यंत विधानसभानिहाय भाजपची निवडणूक कार्यालये सुरू करण्याचे आदेश सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी दिले आहेत.

बॅनरबाजी करणाऱ्यांना…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली असून उमेदवारासाठी कोणीही नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. निवडून येण्याची क्षमता व अन्य बाबी पाहून उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. बॅनरबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा कठोर इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्याआधी गुजरात व अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आणि प्रस्थापित आमदारांना उमेदवारी नाकारली होती. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी न देता नवीन चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रकारचे धोरण लोकसभा निवडणुकीतही राबवणार असल्याचे भाजपने सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here