सोलापूर,दि.11: महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी MVA ने 30 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला फक्त 17 जागा जिंकता आल्या. भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली होती आणि फक्त 9 जिंकल्या होत्या. लोकसभेला भाजपाला मोठा धक्का बसला होता. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 132 उमेदवार विजयी झाले. भाजपाला विधानसभेत मोठे यश मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मोठी कबुली दिली आहे. प्रवचनकार तसेच सोलापूर तरुण भारतचे माजी संपादक विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवावर महत्त्वाची कबुली दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं अतिआत्मविश्वास हे देखील कारण असल्याचं फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये मान्य केलं. लोकसभा निवडणुकीत माझ्यासह सर्व ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. त्यावेळी विरोधकांच्या प्रचाराचा लोकांवर परिणाम होणार नाही, असं वाटत होतं, पण दुर्दैवानं तो परिणाम झाला, हे फडणवीस यांनी पहिल्यांदाच मान्य केलं.
लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटीव्ह तयार करण्यात महाविकास आघाडीला यश आलं. त्या यशानंतर त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आला. तर आम्ही या निवडणुकीनंतर आमच्या विचार परिवाराला निवडणूक प्रचारात उतरण्याची विनंती केली असं फडणवीस म्हणाले.