Devendra Fadnavis: नारायण राणे यांना नोटीस पाठवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.३०: Devendra Fadnavis: कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस (Police sent notice to Narayan Rane) पाठवली होती. संतोष परब हल्लाप्रकरणात नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नितेश राणे (Nitesh Rane) यांचा ठावठिकाणा नारायण राणे यांना माहिती असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात बोलावले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस हे राणे कुटुंबीयांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस धाडणाऱ्या पोलिसांवर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. याप्रकरणात आता पोलिसांवरच गुन्हे दाखल करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. CRPC १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे (Narayan Rane) यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी असल्याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नितेश राणे यांच्या अटकेच्या शक्यतेनंतर गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून बसले आहेत. या अधिकाऱ्यांनाही फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. नारायण राणे यांना नोटीस पाठवणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल न केल्यास भाजपा CRPC १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC ३४ अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजप करेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here