कोण होतास तू काय झालास, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू : देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

0

सोलापूर,दि.16: अमरावती हिंसाचारावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणी राज्याचे माजी कृषीमंत्री विद्यमान आमदार अनिल बोंडे (anil bonde) यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. मालेगाव आणि अमरावती हिंसाचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. ‘या हिंसाचारामध्ये हिंदूची दुकानं मोजून फोडली पण महाविकास आघाडीचे नेते गप्प का होती, संजय राऊत (sanjay raut) यांचं आश्चर्य वाटतं, कोण होतास तू काय झालास, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी राऊतांना टोला लगावला.

मुंबईमध्ये भाजपची कार्याकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनीही अमरावती हिंसाचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

‘राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये काय घडलं याची कल्पना होती. तिथे मशिद जाळली नाही, कुराण जाळले नाही, कुणाला दुखापत झाली नाही. पण, त्यानंतर राहुल गांधी यांनी 9 तारखेला ट्वीट केले. त्यानंतर 11 तारखेला मालेगावात मोर्चे निघले. मालेगावात एकाच वेळी हजारो लोकांच्या संख्येनं मोर्चे कसे काढतात. संपूर्ण सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले आहे. हा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदूची दुकानं जाळली, यावर कोणी बोलत नाही. हिंदूचे दुकान जाळले तेव्हा महाविकास आघाडी सरकारचा नेता कुणी बोलला का, दूकान हिंदूचे मुस्लिमाचे असो जाळणे चुकीचे आहे. सरकारच्या नेत्यांची तोंड शिवली गेली होती का? असा सवाल फडणवीसांनी विचारला.

तसंच,’संजय राऊत यांचं मला आश्चर्य वाटतं. एक गाणं होतं, ‘कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’. भाजपने दंगल पेटवली असा आरोप करत आहे. नवाब मलिक यांचा तर प्रश्न नाही, हर्बल तंबाखू वगैरेमुळे. मुळात त्यांना ठेवलेच त्यासाठी. हे षडयंत्र उघड होऊ नये म्हणून त्यांनी भाजपवर आरोप केला, असंही फडणवीस म्हणाले.

‘आम्ही दंगल करणारे लोक नाही. पण जर कोणी अंगावर धावून आलो तर आम्ही ते सहन करणार नाही.सरकारला वाटत असेल की आम्ही सत्तेत आहेत काहीही करू तर तसे होणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू. भाजपचा कार्यकर्ता कुठल्याही निष्पाप लोकावर हल्ला करणार नाही. एखाद्यावेळेस अल्पसंख्याकाला भाजपचा कार्यकर्ता मदत करेल. पण जर आमच्यावर कुणी चाल करून आलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here