देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

0

सोलापूर,दि.२३: सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यास केलेला विरोध मागे घेतल्यानंतर आज लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा पंढरीत पार पडत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले. नियोजित वेळेप्रमाणे त्यांनी पहाटे २.१५ वाजता सपत्नीक श्री विठ्ठल आणि रखुमाईची महापूजेला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावे, पावसामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना फडणवीसांनी विठुरायाकडे केली.  

देवेंद्र फडणवीसांची पंढरपुरात शासकीय महापूजा करण्याची, विठु-माऊलीचं सपत्नीक दर्शन घेण्याची ही सहावी वारी आहे. त्यामुळे, या सहाही वारीसाठी आम्हाला विठ्ठल-रखुमाईच्या महापुजेची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी मंदिर समितीचे आभार मानले. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागणं मागितलं. तसंच मागणं मी विठुरायाचरणी करतो, सर्वांना सुखी ठेवण्याची, समाधानी ठेवण्याची शक्ती माऊलीने आम्हाला द्यावी, असेही फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि सर्वच जिल्हा प्रशासनाचे आभारही मानले. दरम्यान, वारकरी बबन दादा घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्यास मानाचे वारकरी होण्याचा बहुमान मिळाला. 

पंढरी नगरीत श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेतही लाखांवर भाविक उभे आहेत. ही दर्शनरांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर दूरपर्यंत गेली आहे. तर, संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. येथील ६५ एकर परिसरात लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्यात आहेत. तर, ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here