सुरत,दि.20: गुजरातच्या हिरे व्यापाराच्या लेकीने खेळण्या बागडण्याच्या वयात संन्यास घेतला आहे. सुरतचे हिरे व्यापारी धनेश-अमी बेन संघवी यांची 8 वर्षीय मुलगी देवांशी संघवी (Devanshi Sanghvi) हिने ऐशोआरामाचा त्याग करून जैन साध्वी म्हणून दीक्षा घेतली. बुधवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला 35 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. अनेक संत-मुनींच्या उपस्थितीत आचार्य कीर्तियश सुरीश्वर महाराज यांच्या हस्ते देवांशी हिने जैन साध्वी म्हणून दीक्षा घेक संन्यास मार्गाच्या जीवन प्रवासाला सुरुवात केली आहे. देवांशीच्या दीक्षा महोत्सवासाठी घोडे, हत्ती, उंट यांच्या उपस्थिती मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होते.
मोठ्या संख्येने भाविक उपस्थित | Devanshi Sanghvi
चिमुकल्या देवांशीच्या दीक्षा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. हिरे व्यापाऱ्याच्या मुलीने एवढ्या कमी वयात साध्वी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवांशी साध्वी झाल्यानंतर तिला निरोप देताना तिचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहे देवांशी संघवी? | Who is Devanshi Sanghvi
देवांशी 100 कोटींची वार्षिक उलाढाल असलेले गुजरातमधील हिरे व्यावसायिक धनेश संघवी यांची मुलगी आहे. धनेश संघवी यांची संघवी अँड सन्स कंपनी सर्वात जुन्या हिरे कंपनीपैकी एक आहे. धनेश संघवी यांना दोन मुली असून देवांशी त्यांची मोठी मुलगी आहे. देवांशी संघवी ही संघवी मोहनभाई यांची नात आणि भेरुतारक तीर्थ धामचे संस्थापक संघवी भेरमल हकमाजी यांच्या कुटुंबातील संघवी धनेश-अमी बेन यांची मुलगी आहे. देवांशीचे आईवडील सांगतात की, ती नेहमी मोबाईल-टीव्हीपासून दूर राहिली. देवांशीने आतापर्यंत 367 दीक्षा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
जैन साध्वी होण्यासाठी कठोर तपश्चर्या
दीक्षा घेण्यापूर्वी, देवांशीने भिक्षुंसोबत पायी 600 किमीचा प्रवास केला आणि अनेक कठीण तपस्येनंतर तिला तिच्या गुरूंनी संन्यास घेण्याची परवानगी दिली. जैनाचार्य कीर्तिसुरीश्वरजी महाराज यांच्याकडून देवांगीने दीक्षा घेतली आहे.
कोटींची मालमत्ता पण जीवन अगदी साधारण
देवांशीचे वडील, धनेश सांघवी, सूरतमधील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक असण्यासोबत कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. सांघवी अँड सन्स कंपनीचे संस्थापक महेश सांघवी यांना एकुलता एक मुलगा आहे. सांघवी डायमंड कंपनीच्या देशाच्या अनेक भागात तसेच जगातील अनेक देशांमध्ये शाखा आहेत. तर कंपनीची उलाढाल करोडोंमध्ये आहे. दोन बहिणींमध्ये मोठी, देवांशी कंपनीची वारसदार होती, पण खेळण्या बागडण्याच्या वयात तिने संपत्तीचा मोह सोडला आणि संन्यास घेतला. कोट्यवधींची संपत्ती असूनही हिरे व्यापाऱ्याचे कुटुंब सामान्य जीवन जगतात.
सुवर्णपदक विजेती देवांशी
देवांशीने धार्मिक शिक्षणावर आधारित क्विझमध्ये सुवर्णपदक पटकावले. यावरूनही ती धार्मिक शिक्षणात पारंगत असल्याचे सिद्ध होते. तसेच हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जरवाडी आणि गुजराती भाषांवर तिचे प्रभुत्व आहे. पण धर्माव्यतिरिक्त तिने संगीत, भरतनाट्यम आणि योग शिक्षणही घेतले. देवांशीने आजपर्यंत कधीही टीव्ही पाहिला नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले.