Solapur : उपमहापौर राजेश काळेंना तडीपार आदेशाचा भंग केल्याने अटक

0

सोलापूर,दि.17: सोलापूर महानगरपालिकेचे (Solapur Municipal Corporation) भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर राजेश काळे (Deputy Mayor Rajesh Kale) यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. राजेश काळे यांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. दोन वर्षासाठी तडीपार केले असताना आदेशाचा भंग करून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये राजरोसपणे फिरणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या तडीपार उपमहापौराला मोहोळ पोलिसांनी गुरूवारी (16 डिसेंबर) रात्री अकरा वाजता अटक केली.

उपमहापौर राजेश दिलीप काळे (वय 41, रा. फ्लॅट नं. 101, गॅलक्सी अपार्टमेंट, वीरशैव नगर, जुळे सोलापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यात पो. कॉ. पांडुरंग जगताप यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश दिलीप काळे यांच्या विरोधात तडीपारीचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉ. शरद ढावरे हे करीत आहेत. या गुन्ह्यामुळे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मोहोळ पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. राजेश काळे यांच्या वर्तणुकीमुळे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी उपमहापौर राजेश काळे (Deputy Mayor Rajesh Kale) यांच्यावर सात गुन्हे दाखल असल्याने त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी सोलापूर पोलिसांकडून राजेश काळे यांना दौंड तालुक्यात सोडण्यात आले होते.

दरम्यान राजेश काळे हे तडीपार आदेशाचा भंग करून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी पथकाचे इन्चार्ज हेड कॉ. शरद ढावरे, पो.कॉ. हरिदास थोरात, पांडुरंग जगताप, गणेश दळवी यांच्या पथकाने 16 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता अर्जुंनसोंड पाटी येथील हॉटेल येरमाळा येथे छापा टाकला असता, राजेश काळे पोलीस पथकाच्या हाती लागला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here