मुंबई,दि.26: Ajit Pawar On Loudspeaker: महाराष्ट्रात भोंग्यावरून वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी भूमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला पाहिजे अशी भूमिका मनसेने घेतली. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. “महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो. सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते. हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (25 एप्रिल) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले.
अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने याची अंमलबजावणी करेल, तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग नियम, कायद्यानुसारच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.”
“राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा रहावा, सौहार्दाचे वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कायदा सर्वांसाठी समान
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “ध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी सारखाच बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017 पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासननिर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे.”