मुंबई,दि.२४: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवसेना (उध्दव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. देशातील हिंदू आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला अस्मितेसाठी स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारला करण्यात आली.
ही केवळ शिवसेनेची मागणी नसून महाराष्ट्रातील मराठी जनतेची आणि जगभरातील तमाम हिंदूंची लोकभावना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी ही मागणी केली.