नांदेड,दि.15: एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचे (बाळासाहेबांची शिवसेना) चिन्ह रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मशाल हे चिन्ह तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना व ढाल तलवार हे चिन्ह दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं आहे. पण आता नांदेडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने घेतली.
एकनाथ शिंदे गटाची निशाणी ढाल तलवारवर नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा च्या माजी सदस्याने आक्षेप घेतला आहे. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या पाचही तखतांवर रोज ढाल तलवारी हे पूजन केले जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजितसिंग कामठेकर यांनी घेतलाय.
त्रिशुल जेव्हा धार्मिक निशाणी असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने ते नाकारलं. जर त्रिशुल धार्मिक निशाणी असेल तर ढाल तलवार सुद्धा धार्मिक निशाणी आहे. गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती, जर त्रिशुल चिन्ह धार्मिक चिन्ह म्हणून बाद केले जाऊ शकते तर, ढाल आणि तलवारीबाबतही निर्णय व्हावा, अशी मागणी रणजितसिंग यांनी केली.
ढाल तलवार हे कोणत्याही राजकीय पक्षाला चिन्ह म्हणून देऊ नये. अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीट करून याबद्दल मागणी केली आहे, असंही रणजितसिंग यांनी सांगितलं.