व्हाया सोलापूर नियोजित मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गामध्ये बदल न करण्याची मागणी

0

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी

सोलापूर,दि.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित बुलेट ट्रेन मुंबई ते हैद्राबाद तसेच नागपुर ते मुंबई सुरु करणेबाबत घोषित केले होते. त्यास अनुसरुन मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनचा जो मार्ग निवडला गेला आहे तो व्हाया सोलापूर मार्गे आहे व त्याचा सर्व्हेही करण्यात आलेला आहे. पुर्वी घोषित केल्याप्रमाणेच ट्रेनचा मार्ग रहावा अशी सोलापूरातील तमाम नागरिक, व्यापारी, उद्योजक, कारखानदार यांची मागणी आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा औद्योगिक जिल्हा राज्यातील महत्वाचा जिल्हा आहे. भविष्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्हयानंतर उद्योग व रोजगार वाढीस सोलापूरातच वाव आहे.

स्मार्ट सिटी सोलापूर हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडु या राज्यांना जोडणारे शहर असुन सोलापूरजवळील तीर्थक्षेत्र पंढरपुर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर व शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या दर्शनाकरीता राज्यातुन व परराज्यातुन लाखो भाविक येथे येत असतात. यामुळे मोठया प्रमाणात पर्यटनास वाव असतो. तसेच सोलापूरातील प्रसिध्द उत्पादने सोलापूर शहरांतुन मोठया प्रमाणात देशभरात निर्यात केली जातात.

मुंबई ते हैद्राबाद ही बुलेट ट्रेन व्हाया सोलापूर मार्गेच नेण्यात यावी या मार्गामध्ये बदल करु नये व येथील नागरिक, व्यापारी, उद्योजक, कारखानदारवर्गाला दिलासा दयावा, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व सचिव धवल शहा यांनी केली आहे.

या संदर्भात सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,
आमदार विजकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here