सोलापूर,दि.5: वाघोली ता. मोहोळ येथील ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड हे गेल्या 4-5 वर्षांपासून वाघोली ग्रामपंचायतमध्येच ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षात वाघोलीच्या विकासाला बाधा पोहचविण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. 15 व्या वित्त आयोगाचा आलेला निधी खर्च करत असताना त्यांना टक्केवारीच्या वाजवी अपेक्षा आहेत, आणि गावातील विविध कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, असा आरोप वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी केला आहे.
वारंवार गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही बदली झालेली नाही, परिणामी चंद्रकांत गायकवाड यांचा मुजोरपणा वाढतच चालला आहे, त्यांच्या निष्क्रियपणामुळे गावातील गरजू नागरिक विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत, येत्या आठ दिवसात ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड यांची बदली करा अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी गट विकास अधिकारी गणेश मोरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
गावातील कोणत्याही विकासकामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा अथवा अधिकारी म्हणून मदत मिळत नाहीच उलट गावातील अनेक नागरिकांना त्रास देण्याचे काम ते करताना दिसत आहेत. आलेल्या निधीच्या विकासकामांनाही खोडा घालण्याचे काम सातत्याने सुरू आहे. वाघोलीतील नागरिकांना वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांचा लाभ त्यांच्या निष्क्रियतेमुळे मिळत नसून आर्थिक अपेक्षेपोटी केवळ टाळाटाळ करत आहेत. विकासकामांच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर कडून अवास्तव अपेक्षा व्यक्त करून गावच्या विकासाला खीळ घातली आहे.
या कार्यकाळात सॅनिटायझर फवारणी, घरकुल आणि इतर अनेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे गावातील घरकुल आणि इतर गरीब आणि गरजू वैयक्तिक लाभार्थी वंचित राहिलेले आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली आहे.
गावकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही – विकास वाघमारे
निष्क्रिय आणि भ्रष्ट ग्रामसेवकामुळे माझे वाघोली गाव विकासासाठी वंचित राहत असून मी त्याचा नाहक त्रास कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांना होऊ देणार नाही. येत्या आठ दिवसात जर तातडीने ग्रामसेवक गायकवाड यांची बदली झाली नाही तर 10 मार्च 2022 पासून वाघोली ग्रामपंचायतला “टाळे ठोकणार” असून त्यानंतर मोठे आंदोलन करणार आहे.