नवी दिल्ली,दि.21: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या खिसेकापू टिप्पणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुरुवारी (21 डिसेंबर) दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, हायकोर्टाने म्हटले आहे.
दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांत या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. खरे तर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये निवडणूक रॅली काढताना पीएम मोदींवर खिसेकापू, पनौती मोदी अशी टीका केली होती.
कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, कथित विधाने योग्य नाहीत. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी. हायकोर्टाने या संदर्भात राहुल गांधी यांना नोटीसही बजावली आहे. “उत्तर दाखल करण्याची मुदत संपली आहे आणि कोणतेही उत्तर आलेले नाही हे लक्षात घेऊन, न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.
23 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये न्यायालयाने म्हटले होते की, निवडणूक आयोगानेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. याचिकाकर्ते भरत नागर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह सर्वोच्च सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींवर घृणास्पद आरोप करणारे भाषण केले होते, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना खिसेकापू म्हटले होते.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी 21 नोव्हेंबर रोजी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, पीएम म्हणजे पनौती मोदी. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लीम करतात आणि कधी क्रिकेटच्या सामन्याला जातात. ही वेगळी गोष्ट आहे की तिथे गेल्यावर टीमचा पराभव झाला आहे. नागरिकांचे लक्ष इतर मुद्यांवर वळवणे हे पंतप्रधान मोदींचे काम आहे. खिसेकापूदेखील असेच असतात. दोन खिसेकापू येतात. एक तुमच्यासोबत बोलतो आणि तुमचे लक्ष इतरत्र वळवतो. त्याच वेळी दुसरा खिसेकापू येऊन तुमचा खिसा कापतो.
राहुल गांधी यांनी हे वक्तव्य पंतप्रधान मोदींना उद्देशून केले होते. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाला होता. हा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना पनौती म्हणण्याचा ट्रेंड सुरू झाला होता. राहुल गांधी यांच्या सभेतही उपस्थितांनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटले. त्याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी टीका केली.