नवी दिल्ली,दि.११: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, एका कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती आणि त्यात स्फोट घडवण्यात आला होता. यंत्रणांच्या मते, हा एक आत्मघातकी हल्ला होता. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की दिल्ली लाल किल्ला स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी आहे.
घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी पोलिस करणार आहेत, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही याची खात्री होईल. गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद हे आय-२० कारमधील प्रवासी होते. या व्यक्तीचा सीसीटीव्ही फोटो मिळाला आहे, ज्यामध्ये तो काळा मास्क घातलेला दिसत आहे.
फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांसह इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मद यांचा शोध घेत होते.
फरिदाबाद मॉड्यूलमधील दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद फरार होता आणि एजन्सी त्याचा शोध घेत होत्या.
सूत्रांनुसार, स्फोटावेळी दहशतवादी उमर मोहम्मद कारमध्ये एकटाच होता. त्याने इतर दोन सहकाऱ्यांसह हल्ल्याची योजना आखली होती. सूत्रांनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटकेची मालिका सुरू झाली तेव्हा तो पकडला जाण्याची भीती बाळगू लागला आणि घाबरून त्याने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने त्याच्या साथीदारांसह कारमध्ये डेटोनेटर बसवून स्फोट घडवून आणला.








