मानहानी दावा : उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना केला खडा सवाल

0

मुंबई,दि.१३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) व त्यांच्या कुटुंबीयांवर समाजमाध्यमांतून अनेक आरोप केले. त्यामुळे मलिक यांना आपल्या कुटुंबीयाविरोधात व समीर वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यास मनाई करावी, यासाठी समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

‘याचिकादार (ज्ञानदेव वानखेडे) यांचा मुलगा समीर वानखेडे याच्या नावे असलेल्या कथित जन्मदाखल्यात काही अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसते. मग त्याआधारे ट्वीट करण्यापूर्वी त्या कागदपत्राची सत्यता तपासण्याची खबरदारी तुम्ही घेणे अपेक्षित होते. सर्वसामान्य व्यक्तीला सत्यता तपासणे कदाचित सहजशक्य होणार नाही. तुम्ही (नवाब मलिक) आमदार, मंत्री व राष्ट्रीय राजकीय पक्षाचे प्रवक्ते असल्याने तुलनेने शक्य होते. मग तुम्ही अधिक खबरदारी का घेतली नाही’, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी केला.

नवाब मलिक यांच्याविरोधात वानखेडे यांनी उच्च न्यायालयात १.२५ कोटी रुपयांचा मानहानी दावा केला आहे. त्या दाव्यात वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी यापुढे समाजमाध्यमांवर काहीही आक्षेपार्ह पोस्ट करण्यास मनाई करावी, अशी अंतरिम मागणी केली आहे. या मागणीवरील आदेश उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

‘मलिक यांनी मी मुस्लिम असल्याचे आणि माझे नाव दाऊद असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मी प्रथमपासूनच ज्ञानदेव वानखेडे असून, सगळीकडे त्याच नावाची कागदपत्रे दिलेली आहेत. एनसीसी, मुंबई पोलिस, उत्पादन शुल्क विभागात सेवा बजावताना, पासपोर्ट काढताना व अन्य सर्व ठिकाणी माझी त्याच नावाची कागदपत्रे आहेत. शिवाय महार जातीचे प्रमाणपत्रही मी आवश्यक तिथे वापरले आहे. झायेदा या माझ्या दिवंगत पत्नीने हिंदू धर्म स्वीकारून माझ्याशी विवाह केला होता. तसे प्रतिज्ञापत्र करून त्याची नोंदणीही तिने केली होती. तरीही पालिकेच्या कथित जन्मदाखल्याचा आधार घेत मलिक यांनी आमच्यावर निराधार आरोप केले. शिवाय मालदिवला आम्ही फिरायला गेलो तेव्हा बॉलीवूडमधील काही कलाकारही त्या परिसरात होते, याचा संबंध जोडून आमच्यावर खंडणीचे आरोप त्यांनी लावले. याला चाप लागायला हवा.

मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक होऊन आठ महिने तुरुंगात राहावे लागले. त्याचा राग म्हणूनच समीर यांना जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी मला व माझ्या कुटुंबाला लक्ष्य केले’, असा युक्तिवाद वानखेडेंनी ॲड. अर्षद शेख यांच्यामार्फत केला. तर ‘ट्वीटमध्ये वापरलेली कागदपत्रे मी स्वत: तयार केलेली नाहीत. वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पूर्वी पोस्ट केलेल्या फोटो, मजकुराचाच वापर मी केला. ज्ञानदेव यांनी स्वतःच २०१५ मध्ये त्यांचे फेसबुक अकाऊंट अपडेट करताना दाऊद वानखेडे असे नाव लिहिले होते. मग मी त्यांना दाऊद म्हटल्यावर त्यांची बदनामी कशी झाली कळत नाही. पालिकेने दिलेल्या जन्मदाखल्याचीही मी वाजवी शहानिशा करूनच ते पोस्ट केले होते. ती प्रत खोटी असल्याचा वानखेडेंचा दावा असेल तर त्यांनी खऱ्या दाखल्याची मूळ किंवा झेरॉक्स प्रतही न्यायालयात दिलेली नाही’, असा युक्तिवाद मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी मांडला. त्यानंतर न्यायमूर्तींनी आपला निर्णय राखून ठेवला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here