आमदार दीपक केसरकरांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधान

0

मुंबई,दि.7: एकनाथ शिंदे गटातील आमदार दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर गेले आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले.

संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर असलेली चांडाळचौकडी शिवसेना बुडविल्याविना राहणार नाही. राऊत जे म्हणतील, त्याप्रमाणे शिवसेना सध्या हलते आहे. काही झेलकरी त्यांची पालखी वाहत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. ती चांडाळचौकडी बाजूला केली, तरच पक्षाचे भवितव्य असल्याचा सल्ला एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला.

महाविकास आघाडीत गेली अडीच वर्षे गळचेपी झाली. सहनशीलतेचा अंत झाा, त्यामुळेच उठाव केला. आम्ही पक्षातच असून उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडून शिवसेना संपवण्याचा डाव आहे, असा हल्लाबोल आमदार शंभूराजे देसाई यांनी केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here