यापुढे पत्रकार परिषदेत मी नारायण राणेंचं नाव घेणार नाही: दीपक केसरकर

0

मुंबई,दि.6: एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यापुढे पत्रकार परिषदेत मी नारायण राणेंचं नाव घेणार नाही असे म्हटले आहे. नुकतेच पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे म्हटले होते. नारायण राणेंसोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते. आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. जेव्हा आमची भेट होते, तेव्हा आदराने वागतो. जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर तयार असल्याचे, दीपक केसरकर यांनी सांगितलं. माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणं चुकीचं आहे, असेही केसरकर म्हणाले.

आम्ही शिंदे साहेबांच्या साथीनं जे केलंय ते लोकांना मान्य आहे. माझा आणि राणेंचा वाद जगाने पाहिला आहे, मी यापुढे राणेंचं नाव पत्रकार परिषेदत घेणार नाही. मी आयुष्यात काही तत्व पाळतो, त्यामध्ये मी पवारांचं नाव कधी घेतलं नाही. तसंच राणेंचं नाव घेणार नाही, असे केसरकर म्हणाले.

मी काल केलेलं जे वक्तव्य होतं त्याबद्दल मी स्पष्ट करतो की, उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची होती याबद्दल कोणीही बोललं नाही. मी बोललो त्यामध्ये खोटं आहे, असंही कुणी बोलले नाही. म्हणजे त्यांना युती करायची होती पण आम्ही केली तर ते चुकीचं असं कसं?, असे केसरकर म्हणाले.

जेव्हा उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही. त्यामुळे आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात? असा सवाल केसरकर यांनी विचारला. ‘अनेक शिवसैनिकांचे मला फोन येतात की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणा, मात्र हे प्रयत्न मी केले आहेत. मी जेवढा पुढाकार घ्यायचा तेवढा घेतला, मात्र कालचे आदित्य ठाकरेंचे स्टेटमेंट बघितले तर पेपर नॅपकीन वापरुन फेकावा असे होते, असेही केसरकर म्हणाले.

तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत प्रेम असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. भाजपाने महापालिकेत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तुम्ही स्वप्नात वावरत आहात, माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जमिनीवर या, असेही केसरकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here