Deepak Kesarkar: भाजपा नेत्यांनी केलेल्या विधानांवरुन आमदार दिपक केसरकरांनी व्यक्त केली नाराजी

0

मुंबई,दि.30: आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाजपा (BJP) नेत्यांनी केलेल्या विधानांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आणि त्याचा शेवट उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राजीनामा देण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाने जल्लोष केला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांवरुनही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली. कुणीतरी एका नेत्याने प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, पण दहा -10 नेते प्रतिक्रिया देत होते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या प्रतिक्रियांमुळे आम्ही दुखावले जाणारच, कारण आम्ही आमच्या नेत्याविरुद्ध बंड केला नव्हता, आमचा बंड राष्ट्रवादी-काँग्रेसविरुद्धचा होता, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पायउतार झाले याचं आम्हालाही दु:ख झालं ना. डोळ्यात अश्रू आले ना, ते अश्रू दिखाव्याचे नाहीत. सत्तास्थापन करत असताना कोणीतरी व्यक्तीगत का बोलावं. प्रत्येकाने भावनांची कदर ठेवली पाहिजे, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतोच ना, असेही केसरकर यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या अनेकांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या, भाजप नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही. कारण, ते ज्या पद्धतीने बोलत होते, त्यातून काहींची मने दु:खी होतात. आमच्या गटाकडून ज्याप्रमाणे प्रवक्त म्हणून मी एकटा बोलतो, तसेच भाजपकडूनही ठराविक लोकांनीच बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी बोलले असते तर ते स्विकारार्ह होतं, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या विजयी जल्लोषानंतर काहीशी नाराजीही व्यक्त केली आहे. मी फडणवीस यांना जाहीर विनंती करतो, हे ताबडतोब थांबवा. कारण, आम्हीही आमच्या नेत्यासोबत संघर्ष केला. आता, तुम्ही सत्तेवर येत असाल तर त्या लोकांना ताबडतोब थांबवलं पाहिजे, अशी विनंती केसरकर यांनी फडणवीसांकडे केली आहे. 

गोव्यात आज एकनाथ शिंदे गटाची बैठक होत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होत आहे. सरकारे येत असतात, जात असतात पण विचार महत्त्वाचा असतो. आम्ही शिवसेनेचेच आहोत, शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्वाचा हा एक विचार आहे. त्यामुळे, आमचा वेगळा गट वगैरे नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली. आमचा मंत्रीपदासाठी बंड असेल तर मग आमच्याकडे 6 मंत्री सोबत का आले हेही विचार व्हावा. आमचा बंड हा विचारधारेचा होता, असेही केसरकर यांनी म्हटले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here