मुंबई,दि.24: एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी आहे मात्र प्रकरण न्यायालयात असल्याने यावर आता निर्णय घेता येणार नाही. विलिनीकरणाबाबतची त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल देईल तो राज्य सरकारला मान्य असेल असेही अनिल परब यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने विलिनीकरणाबाबत स्थापन केली समिती. या समितीचा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती असेही परब म्हणाले. कामगारांना कामावर हजर राहण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.
आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए दिला जातो, तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासन दिलं होतं. करारात तसं होतं. विषय बेसिकचा होता. जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परब यांनी सांगितलं.
पगारात वाढ
ज्याचं मूळ वेतन 12 हजरा 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार 16 हजार होता. त्यांचा पगार 23 हजार 40 झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार झाला आहे. 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन हजाराने वाढ केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.