पुणे,दि.15: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 99 वर्षांचे होते. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते.
गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.