ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणारा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केली ही मागणी

0

दि.2: मुंबईतील चर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचे शुक्रवारी निधन झाले. त्याचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल याचे चेंबूरमधील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर प्रभाकर साईल हे नाव चर्चेत आले.

प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटलं आहे की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशासमोर आणला होता. एनसीबीचा तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे कशा फर्जी कारवाई करतो हे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत सिद्ध केले होते. त्यामुळे केंद्रीय एजन्सी असलेल्या एनसीबीची (NCB) देशभर नाचक्की झाली होती असेही महेश तपासे म्हणाले.

महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, समीर वानखेडे याच्या टीममध्ये फर्जी अधिकारी के. पी. गोसावी आणि इतर सहा जणांना नवाब मलिक यांनी समोर आणत त्यांचं भाजप कनेक्शन कसं आहे याचे पुरावे माध्यमांना पत्रकार परिषदेत देत एनसीबीची पोलखोल केली होती.

तपासे यांनी म्हटलं आहे की, फर्जी अधिकारी के. पी. गोसावी याचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने नवाब मलिक यांनी फर्जीवाडा समोर आणल्यानंतर ही कारवाई कशी फर्जी होते हे समोर आणले होते. मात्र आज त्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने 60 दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू होतो यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here