Cyrus Mistry: शवविच्छेदन अहवालातून सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं नेमकं कारण झालं स्पष्ट

0

मुंबई,दि.6: Cyrus Mistry Death: उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. (Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai) पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री हे 2013 ते 2016 या दरम्यान टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.

‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकस्मिक निधनामुळे उद्योग जगताला मोठा धक्का बसला. उद्योगविश्वासोबत इतर सर्वच क्षेत्रातून सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येताना चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली आणि त्यात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर कारमध्ये प्रवास करताना सीटबेल्ट लावण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं नेमकं कारण त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

अपघात कसा झाला?

हा अपघात कसा झाला यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा गाडी फार वेगात होती असं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. तसेच गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलिसांनी म्हटल्याचं पीटीआयने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सीटबेल्टचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना सायरस मिस्त्री यांचा मृत्यू शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना झालेली गंभीर इजा आणि अनेक फ्रॅक्चर्समुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात करण्यात आलं. यानंतर त्यासंदर्भातला अहवाल समोर आल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

अहवालामध्ये काय आहे?

या अहवालात नमूद केल्यानुसार, सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन मेंदूतून अतीरक्तस्त्राव झाला. छाती, डोके, मांडी आणि मानेत अनेक फ्रॅक्चर्स झाले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गंभीर इजा शरीराला बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे होऊ शकते. अशी इजा झाल्यास व्यक्तीचा लागलीच मृत्यू देखील ओढवू शकतो.

सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल हे दोघे कारच्या मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला नसल्यामुळे अपघातामध्ये त्यांच्या शरीराला जबर दुखापत झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here