मुंबई,दि.८: राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग पार्टीवर टाकण्यात आलेली धाड बोगस असून यात निरपराध लोकांना अडकवण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच या पार्टीचे निमंत्रण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही देण्यात आले होते असा गौप्यस्फोट केला होता. अनेक नेत्यांच्या मुलांना या पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या सर्वांना अडकविण्याचा प्लॅन होता असा आरोपही मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांच्या आरोपांनंतर मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांचे काशिफ खानसोबत संबंध आहेत. शेख यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा,’ अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली होती. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळं अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा तपास यंत्रणा करत आहे,’ असा खुलासा अस्लम शेख यांनी केला आहे.
‘मी काशिफ खानला ओळखत नाही. माझ्याकडे त्याचा फोन नंबरही नाही. तो एका ठिकाणी मला भेटला होता. त्याने भेटूनच मला पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहिती नाही. काशिफसोबत फोनवर संभाषण झाल्याचं मला आठवत नाही त्याने भेटूनच आमंत्रण दिलं होतं,’ असाही दावा अस्लम शेख यांनी केला आहे. तसंच, ‘मला ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती मी घेत नाही. पालकमंत्री असल्यानं मला दिवसभरात ५० लोक आमंत्रित करतात. मी ज्या कार्यक्रमात जातो त्याती माहिती घेत असतो,’ असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
मोहित कंबोज यांचा आरोप काय?
अस्लम शेख यांचे काशिफ खानसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप मोहित कंबोज यांनी रविवारी केला. शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. अनोखळी व्यक्ती एकदा आमंत्रित करेल, परंतु ओळख असल्याशिवाय वारंवार कसे बोलावले जाते? असा प्रश्न कंबोज यांनी उपस्थित केला. अस्लम शेख आणि काशिफ खानमध्ये संबंध आहेत, हा माझा आरोप नाही. हे नवाब मलिक यांनीच म्हटले आहे. मी फक्त कोण मंत्री यात आहे असे विचारले होते, मी कुणाचेही नाव घेतले नव्हते, मलिक यांनीच शेख यांचे नाव उघड केले, असे कंबोज म्हणाले.