Saamana: पराभवाचे हादरे बसू लागले की भाजपा त्यांचा हुकमी खेळ सुरू करतो, आताही त्यांनी हिंदू-मुसलमान…

0

मुंबई,दि.३०: Saamana: दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुंबईत शिवसेना भवनाच्या परिसरात ‘हिंदू जन आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल असं आश्वासन अग्रलेखातून देण्यात आलं आहे. तसंच पराभवाचे हादरे बसू लागले की भाजपा त्यांचा हुकमी खेळ सुरू करतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. 

हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे… | Saamana

प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारने समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मुलायम यांनीच दिले होते. त्यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानेच हिंदू जन आक्रोश उसळला व शिवसेना भवनासमोर जमा झाला, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. मोर्चातील सगळ्यांचे शिवसेनेवर ‘लव्ह’ आहे आणि दिल्लीतील ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध ‘जिहाद’ आहे, असाही टोला लगावण्यात आला आहे. 

सामना अग्रलेखातील मुद्दे…

आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल. 

पराभवाचे हादरे बसू लागले की भाजपा त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू मुसलमान खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक खतऱ्यात आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्द्यांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला.

गेल्या आठ वर्षापासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. 

याआधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्वावादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. 

एखाद्या निवडणुकीचे बिगुल वाजले की भाजपाशासित राज्यांत अचानक हिंदू खतऱ्यात येण्याची हालचाल सुरू होते. गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत हिंदुत्व खतऱ्यात येत असेल तर त्या राजवटीतच दोष आहेत. 

‘हिंदू जन आक्रोश’ हा प्रकार फक्त निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठीच असेल तर ती हिंदुत्वाशी बेइमानी ठरेल. धर्मांतराचा मुद्दा गंभीर आहे. आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. पण त्याबाबत राजकारण करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे.   


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here