Covid-19 Ayurvedic treatment: आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचावासाठी सांगितला घरगुती उपाय

0

दि.14: Covid-19 Ayurvedic treatment: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा स्थितीत लसीकरण व प्रतिकारशक्ती महत्वाची आहे. नैसर्गिक प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना काळात फायदेशीर आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने अलीकडेच कोरोनापासून बचावासाठी आयुर्वैदिक उपायांबाबत नवी यादी जारी केली आहे. लोकांना निरोगी राहण्यासाठी आणि संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला हवेत असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) हा अतिशय वेगाने संक्रमण पसरवणारा घातक व्हेरिएंट होत असल्याचं समोर आलं आहे. या आजाराने संक्रमित रुग्णांमध्ये सर्दी-तापासारखी लक्षणं आढळतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने सर्दीची लक्षणं धोकादायक ठरत आहेत. बहुतांश लोकं ताप-सर्दी आणि ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये गोंधळून जात आहेत. ज्यामुळे सहजपणे ते या व्हेरिएंटच्या विळख्यात अडकत आहेत.

कोरोना व्हायरसवर काही ठोस उपाय नाही. सध्या लसीकरण आणि प्रतिकारशक्ती (इम्युन पॉवर) मजबूत करण्यावरच भर दिला जात आहे. सध्या आरोग्य तज्ज्ञ हेल्दी डाइट आणि इम्युन पॉवर वाढवण्याचा सल्ला देत आहेत. घरगुती उपचाराद्वारे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणि कोरोना बचावासाठी आयुष मंत्रालयाने काही उपाय ठेवले आहेत.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा गरम पाणी प्या. दिवसातून किमान 30 मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. हळद, जिरे, धणे असे मसाले जरूर खावेत. स्वयंपाक करताना लसणाचा वापर करावा.

सकाळी 10 ग्रॅम च्यवनप्राश घ्या. मधुमेहींनी साखरमुक्त च्यवनप्राश सेवन करावे. तुळस आणि दालचिनीपासून बनवलेल्या हर्बल टी/काढा सेवन करावे. दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि बेदाणे यांचे सेवन दिवसातून एक किंवा दोनदा करावे. गूळ आणि लिंबाचा रस घ्या. दिवसातून एकदा हळदीच्या गरम दुधाचे सेवन करा.

तिळाचे तेल/खोबरेल तेल किंवा तूप नाकपुडीमध्ये सकाळ संध्याकाळ लावावे. तेल ओढण्याची थेरपी वापरा. यासाठी एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात 2 ते 3 मिनिटे चोळा. हे दिवसातून एक किंवा दोनदा करता येते.कोरडा खोकला आणि घसादुखीवर पुदिन्याची ताजी पाने आणि आले यांची वाफ घ्या. 2-3 कळ्यांचे चूर्ण गूळ किंवा मधात मिसळून घ्यावे.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. घरगुती उपायांनी कोरोनाला पूर्णपणे रोखता येत नाही, त्यामुळे कोरोनाशी संबंधित आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की लोकांनी मास्क घालणे, हात चांगले धुणे, शारीरिक आणि सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण, निरोगी आहार आणि इतर आरोग्य सेवा यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here