Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील या शहरातील शाळा बंद

0

मुंबई,दि.३: महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. कमी होत असलेली कोरोना रुग्ण संख्या (Corona Cases In Maharashtra) पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या (Mumbai) पहिली ते नववीच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे वर्ग ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही घोषणा केली.

महानगरपालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने, मुंबईचे एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे-जाणे सुरू असल्याने या नव्या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेचे दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता अन्य सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळा ४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.’

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढत आहे. राज्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. देशात कोरोनाने गेल्या २४ तासांत १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढून १,४५,५८२ इतकी झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here