मुंबई,दि.२१: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केलं आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. शिवराज पाटील यांच्या विधानानंतर वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर टीका होत आहे.
‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे. श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद शिकवला आहे,’’ असं शिवराज पाटील म्हणाले आहेत.
काँग्रेसची अख्खी विचारसरणी ही सडकी आणि नास्तिक
शिवराज पाटील यांच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मुस्लीम मतांसाठी किती शेणार खाणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे. “शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्या राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला, तुकडे-तुकडे गँगचं समर्थन केलं., त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही,” असं ते ‘एबीपी माझा’शी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की “गीता इतका महान ग्रंथ आहे की, १० हजार वर्षानंतरही त्याची मोहिनी आज सगळ्या जगावर आहे. जगातील सर्व तज्ज्ञ, विचारवंत गीतेने भारावले असताना शिवराज पाटील त्याची तुलना जिहादशी करत आहेत. गीता कर्माचा संदेश देते. पण शिवराज पाटील यांचं डोकं सडलेलं आहे. खरं तर काँग्रेसची अख्खी विचारसरणी ही सडकी आणि नास्तिक आहे याचं उदाहरण हे वक्तव्य आहे”.