बंगळुरु,दि.17: काँग्रेस आमदारानं महिलांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हसत राहिले. कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार केआर रमेश कुमार (KR Ramesh Kumar) यांनी महिलांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भर विधानसभेत के आर रमेश कुमार यांनी ज्यावेळी बलात्कार रोखता यत नसेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं अत्यंत निंदनीय वक्तव्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांनी याचा निषेध करण्याचऐवजी त्या वक्तव्यावर जोरजोरात हसू लागले होते.
विधानसभेत नेमकं काय घडलं?
कर्नाटकात महापुरामुळं झालेल्या शेतीच्या आणि पिकाच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची मागणी आमदारांकडून सुरु होती. यावेळी सभागृहात गदारोळ सुरु होता. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष हेगडेयांनी रमेश कुमार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ‘रमेश कुमार तुम्हाला माहितीचं आहे की या परिस्थितीचा मला आनंद घ्यायला पाहिजे, मी ठरवलंय आता मी कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही चर्चा करा,असं हेगडे म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी विधानसभेत म्हटलं की, ‘एक म्हण आहे….ज्यावेळी बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी झोपून राहावं आणि आनंद घ्यावा, अशीच स्थिती आज निर्माण झालीय.
काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक
केआर रमेश कुमार या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आले आहेत. काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली निंबाळकर यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत सभागृहानं महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या आमदार सौम्या रेड्डी यांनी देखील हे बरोबर नसून माफीची मागणी केलीय.
कर्नाटक काँग्रेसच्या प्रवक्त्या कविता रेड्डी यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष के आर रमेश कुमार आणि सध्याचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांची मानसिकता महिला विरोधी आहे. दोघांनी राजकारण सोडून द्यावं, अशी मागणी कविता रेड्डी यांनी केलीय.
महिला कार्यकर्त्या वृंदा अडिगे यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. ज्या महिला मतदारांनी यांना निवडून पाठवलं त्यांच्यासंदर्भात विधानसभेत आक्षेपार्ह टिप्पणी करणं लज्जास्पद असल्याचं त्या म्हणाल्या. बलात्कार ही किती क्रूर घटना आहे हे त्यांना माहिती नाही का, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस प्रदेश कमिटीनं केआर रमेश कुमार यांना निलंबित करावं, अशी मागणी वृंदा अडिगे यांनी केलीय.