सोलापूर,दि.17: कोरोना रुग्णांची संख्या राज्यातील अनेक जिल्ह्यात वाढत आहे. तर काही जिल्ह्यात कमी होत आहे. सोलापूर शहरात 160 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आज 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 1342 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूर शहर कोरोना बाधितांची एकूण संख्या 30917 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 28108 झाली आहे. आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 1467 झाली आहे, यात 939 पुरुष तर 528 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 196 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आज एकाही रुग्णाची नोंद मृत म्हणून नाही. 1154 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण एकूण कोरोना बाधितांची संख्या 176801 झाली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 171970 झाली आहे. आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 3677 झाली आहे, यात 2389 पुरुष तर 1288 महिलांचा समावेश आहे.
या जिल्ह्याने वाढवली चिंता
अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची वाढ सुरूच आहे. सोमवारी जिल्ह्यात 268 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या 929 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ती 4 हजार 738 झाली आहे. अलीकडच्या काळातील ही उच्चांकी वाढ आहे. तसंच सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सुदैवाने गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे.
तिसरी लाट सदृष्य स्थिती निर्माण होण्यापूर्वी नगर जिल्ह्यात दैनंदिन रूग्णसंख्या 60 ते 80 पर्यंत खाली आली होती. तर उपचाराधीन रुग्ण तीनशेच्या आसपास होते. गेल्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज ती उच्चांकी पातळीवर गेली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळत नसल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेने आता कडक कारवाई सुरू केली आहे.
सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून येत आहे. आज शहरात 359 रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल नगर तालुका आणि अकोले, श्रीगोंदा, श्रीरामपूरमध्ये 50 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर वगळता सर्व तालुक्यांत आता दोन अंकी रुग्ण संख्या आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे तेथे दीर्घकाळ कडक निर्बंध लावले होते. तालुक्याची ही स्थिती लक्षात घेता तेथील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली असून सर्वाधिक लसीकरण संगमनेर तालुक्यात झालं आहे.