राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल

0

औरंगाबाद,दि.१०: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी क्रूझ ड्रग पार्टीवर (Cruise Drug Party) कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. क्रूझ ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. तसेच समीर वानखेडे यांनी धर्मांतर करून नोकरी मिळविल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी मुस्लिम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

हे आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावल्यानंतर नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला होता. त्यानंत नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर आरोपांचा सपाटाच लावला होता. दरम्यान या प्रकरणात आता नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव (Gunfabai Gangadhar Bhalerao) यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे, औरंगाबाद येथे नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे. तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी (गुंफाबाई गंगाधर भालेराव) आणि माझा भाचा समीर वानखेडे हे एकत्र कुटुंबाचे सदस्य असून दोघेही महार (नवबौद्ध) जातीचे आहोत. गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी तक्रार अर्जासोबत वानखेडे कुटुंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडले जोडल्याचे देखील सांगितले आहे.

“समीर वानखेडे यांनी अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरुन नवाब मलिकांचे जावई समीर खान यांना अटक केली होती. या कारवाईमुळे नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्या कुटुंबाचा द्वेष करीत आहेत. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परीषदेत, भाषणात समीर वानखेडे यांच्या कुटुंबांच्या जातीबद्दल वक्तव्य केले. नवाब मलिक यांनी खोटी माहिती पसरवली तसेच समीर यांची नोकरी जाईल, अटक होईल, अशा धमक्या सुद्धा दिल्या. आमच्या सर्व कुटुंबांना मलिक यांनी हानी पोहचवली आहे. मलिक यांनी कलम ३ (१) (क्यू) अ.जा. अ.ज. (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ प्रमाणे प्रथम दर्शणी गुन्हा केलेला आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा नोंदवावा तसेच कारवाई करावी”, अशी मागणी समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here