मुंबई,दि.22: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चेनंतर मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळपर्यंत राजीनामा देऊ शकतात, तसा प्रस्ताव ते स्वत: ठेवतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे आपल्या उरलेल्या आमदारांसह खासदारांशी चर्चा करतील. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्याआधी ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील. सोबतच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील ते चर्चा करतील, अशी माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चेनंतरच होईल असं बोललं जात आहे. मुख्यमंत्री सरकार बरखास्त करण्याची शिफारस करतील. मुख्यमंत्री ठाकरे स्वत: राज्यपालांना याबाबत पत्र लिहितील, अशी देखील माहिती आहे.