महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी, देवेंद्र फडणवीसच भारी!

0

बसवेश्वर बेडगे/सोलापूर,दि.१८: महाराष्ट्रातील २९ महापालिकेचे निकाल जाहीर झाले आहेत. २९ पैकी २० महापालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच १०२ जागांपैकी ८७ जागांवर विजय मिळवला आहे. सोलापुरात ‘अब की बार ७५ पार’चा नारा देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ८७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील यशाचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore), आमदार देवेंद्र कोठे (Devendra Kothe), आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर (Rohini Tadwalkar) यांना जाते. 

सोलापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु व्हायच्या अगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सोपवली होती. पालकमंत्री गोरे यांच्या कार्यपद्धतीबाबत आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) नाराज होते. 

भाजपात दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यावरून दोन्ही देशमुख आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला होता. 

सोलापूर शहरातील विविध पक्षातील नेत्यांचा पालकमंत्री गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पक्षप्रवेश करून घेतला. कोठे आणि गोरे यांच्या या रणनितीला आमदार देशमुखांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरे आणि कोठे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सर्वाधिकार दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताकत दिल्यामुळेच सोलापुरात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून घेण्यात गोरे आणि कोठे यांना यश आले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच सोलापूर महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही आमदार देवेंद्र कोठे निर्णय घेऊ शकले. कोठे यांना बळ दिल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात आयात उमेदवारांना उमेदवारी दिली. निवडणुकीच्या निकालावरून कोठे यांची ‘रणनिती’ यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘राजकीय खेळी’ यशस्वी झाली आहे. 

मुंबई महापालिका प्रथमच फडणवीस यांच्यामुळे भाजपाच्या ताब्यात जाणार आहे. राज्यातील राजकारणात पूर्वीच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार हे कायम चर्चेत व केंद्रस्थानी राहिले. मात्र बदलत्या काळानुसार महाराष्ट्रातील राजकारणात फडणवीस यांचा प्रभाव दिसून येत आहे. फडणवीस ठरवतील ते होणारच असे बोलले जात आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी, देवेंद्र फडणवीसच भारी!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here