मुंबई,दि.२९: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे (omicron) अनेक देशात खळबळ माजली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्र्यांसोबत काल महत्त्वाची बैठक घेतली होती. दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गामुळे आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमिवर आता राज्यात मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे, यामध्ये राज्यात निर्बंध लागू करणार का? यावर चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये नव्या संसर्गाचा शिरकाव होऊ नये, या दहशतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णयही पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आज मंत्रिमंडळाची तातडीने बैठक होणार आहे. एक डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीमध्ये होऊ शकते.
खरंतर, एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होती, पण याचा धोका वाढल्यामुळे हा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे किंवा या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. इतकंच नाहीतर राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का या सगळ्यावरही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली असून यामध्ये चर्चा करणार आहेत.