महायुतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

0

मुंबई,दि.26: महायुतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाशी मनसेची जवळीक वाढली आहे. मनसे, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महायुती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा केला. यंदा या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा-शिंदे गटात महायुती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, की ‘राजकारण हेल्थी राहिलं पाहिजे’. समविचारी पक्षांची संख्या वाढत चालली असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबतही माहिती दिली. 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार सध्या आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दिवाळीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आम्ही लवकरच अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. यासोबतच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण नागपूर ते शिर्डी नोव्हेंबर महिन्यात होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सर्वसामान्य प्रवासी, या महामार्गाने नागपूरला येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here