CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

0

मुंबई,दि.26: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेत फूट पडली. बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन पक्ष अस्तित्वात आले. शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत. आता महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच या दौऱ्याचे नियोजन केले जाणार असून, नोव्हेंबर महिन्या शिंदे गट अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिले होते. महंतांचे हे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यामुळे शिंदे हे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत.   

नोव्हेंबर महिन्यात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट अयोध्येत जाणार असून, रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे येण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आपण पुढे घेऊन जात आहोत, हे दाखवण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन साडेतीन महिने होऊन गेले. शिवाय कोरोनाचे संकटही ओसरलेले आहे. असे असताना शिंदे अजून अयोध्येला गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे हे अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here