Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंमुळे पुरातत्त्व विभागाने रायगडावरील या प्रकाराची घेतली दखल

0

दि.6: Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी किल्ले रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभे करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे (Department of Archeology) तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने त्वरित कारवाई करून सदरचे ठिकाण पूर्ववत केले आहे. तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत फेसबूक पोस्टवरून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दुर्गराज रायगडावरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच मी पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावतीजी आणि मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला. तसेच तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत सकाळी पुरातत्व विभागाला एक पत्र पाठवल्याची माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे.  किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली होती. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here