“त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि ओबीसीमध्ये…” छगन भुजबळ

0

मुंबई,दि.८: ज्यांना कायदेशीर आरक्षण देऊ शकत नाही, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि ओबीसीमध्ये यायचे. तसेच दुसऱ्या बाजूला जे ओबीसी आहेत, त्यांना हायकोर्टात लढून त्यांना ओबीसीच्या बाहेर ढकलायचे, असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. बाळासाहेब सराटे यांनी २७ टक्के ओबीसी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. मनोज जरांगे यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ असा आहे की, त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे आहे. ते म्हणतील, त्याप्रमाणे ते पाहिजे आहे. एकदा ओबीसी प्रमाणपत्र मिळाले की, ते ओबीसीमध्ये येतात. मग त्यांना शिक्षण, रोजगार आणि राजकीय फायदे मिळायला हवेत, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये ३७४-७५ जाती आहेत, त्यात ही सगळी मंडळी आली, तर कुणालाच काही मिळणार नाही. मग ओबीसी संपलंच, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

…हे चुकीचे सुरू आहे

मराठा आरक्षणाला विरोध नाही. तुम्ही त्यांना वेगळे आरक्षण द्या. कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील, त्या दुरुस्त करा. आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. मात्र, सर्रास पाहिजे, सरसकट पाहिजे. आता राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यालये उघडली आहेत. हे आरक्षण फार प्रयासाने मिळवले आहेत. हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला गेला आहे, या शब्दांत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यभरात सुरू केलेल्या कार्यालयात या आणि कुणबी प्रमाणपत्र घेऊन जा, हे जे चाललेले आहे, ते चुकीचे आहे. खरोखर जे कुणबी आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. पण जे चुकीच्या मार्गाने घुसत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, याचा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला. 

दरम्यान, एकदा एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला आणि त्याच्या बायकोला कुणबी प्रमाणपत्र मिळाले की, ब्लड रिलेशनमधील १०० ते २०० जणांना मिळेल. म्हणजे तेवढे जास्त जण परत ओबीसीमध्ये येणार. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, ते आधी सांगावे, मग प्रश्न मिटेल, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here