Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.24: Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कधीही निकाल लागू शकतो. गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय गणिते मांडण्याचा सिलसिला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजकीय गणित मांडून अजितदादा कसे मुख्यमंत्री होऊ शकतात, ते सांगितले होते. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी राजकीय गणित मांडले आहे. तसेच संजय राऊत यांच्या दाव्यावर वेगळीच शंका उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. 

येत्या 15 दिवसांत सरकार कोसळणार आहे. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला होता.  येत्या काळात सर्वोच्च न्यायालायात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागल्यास सरकार बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सदर दावे केल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री बदलाबाबत माझ्याकडे अशी माहिती नाही | Chhagan Bhujbal

संजय राऊत दिल्लीत काम करतात. ते संपादक आहेत. त्यांच्याकडे माहिती येत असते. परंतु, मुख्यमंत्री बदलाबाबत माझ्याकडे अशी माहिती नाही. मुख्यमंत्री बदलले जाणार अशी परिस्थिती नाही. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांची केस सुरू आहे, त्यांच्याविरोधात निकाल गेला तर त्यांची आमदारकी जाईल. त्यात एकनाथ शिंदेदेखील आहेत. ते गेले तर दुसरे मुख्यमंत्री येतील. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे का? आणखी काही निकाल येईल. त्यांच्या विरोधात निकाल आलाच, त्यांचे मुख्यमंत्री पद गेले तरी त्यांच्या सरकरला 165 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे 149 आमदार शिल्लक राहतात. त्यामुळे त्यांचे सरकार त्यांचंच राहील. केवळ मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बदलू शकते, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमीच पुरेशी नसते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. यावर बोलताना, आज आघाडी आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाड होणार असल्याचा अर्थ घेऊ नका, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here