स्वस्त धान्य दुकानदारांचे १ डिसेंबरपासून आंदोलन

0

सोलापूर,दि.२४: आपल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन, नवी दिल्लीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन शॉप फेडरेशन परवानाधारक महासंघाने राज्य व देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते, सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे संघटनेकडून विविध मागण्या, अडचणी, समस्या याबाबत शासनाला वारंवार अनेक निवेदने देऊनही आतापर्यंत महासंघाच्या एकाही पत्राला उत्तर किंवा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सार्वजनिक वितरणात धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून, राज्य शासनाच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी करणारा शासन हा महत्वपूर्ण घटक आहेत. राज्यात, देशात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील परवानाधारक त्रस्त झाले आहेत. या आंदोलनाचा पहिला टप्पा १ डिसेंबर रोजी असून राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधतील.

हिवाळी अधिवेशनाच्या काळात धान्य दुकानदार नागपुरात आक्रमक पवित्रा घेणार आहेत. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्यावतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार १ जानेवारी २०२४ पासून आपली स्वस्त धान्य दुकाने न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय संघटनेने घेतलेला असून राज्यभरातोल रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची राहील, असा इशाराही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here