नागपूर,दि.७: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दुय्यम उपनिबंधक कार्यालयात छापा टाकला आहे. सरकारी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी तक्रार अनेकांची असते. उपनिबंधक कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही अशा तक्रारी आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दुय्यम उपनिबंधक कार्यालयास अचानक भेट देऊन पाहणी केली.
अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे
काही कार्यालयांबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग- २ कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी करावी लागली, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी तेथील रजिस्ट्री प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले.
खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग-२ कार्यालयाबाबत आलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज दुपारी थेट या कार्यालयात अनपेक्षित भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत एका अधिकाऱ्याच्या टेबलमधील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले.








