चंद्रशेखर बावनकुळे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत म्हणाले…

0

मुंबई,दि.31: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य केलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच निधन झालं आहे. बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसेच आमची त्यांना विनंती असेल की त्यांनी उमेदवार देऊ नये, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पुणे भाजपा खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी (29 मार्च) गिरीश बापट यांचे निधन झाले.

1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

दरम्यान यावेळी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करावा. राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने चंद्रकांत खैरेंसारखे ठाकरे गटाचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून आगीत तेल टाकण्याचं काम करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here