देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची वेगळी भूमिका

0

मुंबई,दि.26: देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची वेगळी भूमिका घेतली आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. भाजपा आणि शिंदे गटात मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते अचानक आपल्या गावी निघून गेले, असंही म्हटलं जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना देवेंद्र फडणवीस यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर नागपुरात झळकले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची वेगळी भूमिका

यावरून आता भाजपा आणि शिंदे गटातील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आमचं सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून दाखवू…” देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) वेगळी भूमिका घेतली आहे.

याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही

नेतृत्व कुणी करायचं, याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. याचा निर्णय केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांकडून घेतला जातो, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. “एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली २०२४ ची निवडणूक लढवणार” या फडणवीसांच्या विधानाबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. यावर केंद्रीय संसदीय बोर्डाकडून निर्णय घेतला जातो. कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला उमेदवारी द्यायची? कुणाला मंत्री बनवायचं? कुणाला मुख्यमंत्री बनवायचं? पार्टीचा अध्यक्ष कुणाला बनवायचं? हे सर्व निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाकडून घेतले जातात. हे निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत.”

चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निश्चितपणे फरक आहे

बावनकुळेंना प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “मला वाटतं की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या बाजुनेच बोललं पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पक्षाने सांगितल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदही मोठ्या मनाने स्वीकारलं. त्यांचं मन एवढं मोठं आहे. त्यांनी आज स्वत:च जाहीर केलं की, २०२४ च्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल. त्यामुळे माझी खात्री आहे की, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निश्चितपणे फरक आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here