मुंबई,दि.11: उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत घेतली आहे, असे भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात शिवसेना (ठाकरे गट) 9, काँग्रेसला 13 तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 9, शिवसेना (शिंदे गट) 7 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 1 जागा मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“शिवसेनेला भाजपासोबत युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि 18 जागा जिंकल्या. आता सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली. मित्र असल्याने मला त्यांच्या आजारपणाबद्दल भीती वाटत होती. पण ते फार फिरले आणि 9 जागा जिंकल्या. 2019 मधील युती कायम राहिली नसल्याने ज्यांना घऱी जायचं होतं त्यांना 13 आणि 8 जागा मिळाल्या,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.