सोलापूर,दि.4: Chandrakant Patil On Gautami Patil: मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. पोलिसांनी कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले. ज्या कारने रिक्षाला धडक दिली ती नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) मालकिची आहे. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या अपघात प्रकरणी पोलिस उपअधीक्षक (DSP) यांना फोन केला.
पोलिस उपअधीक्षक यांना चंद्रकांत पाटील यांनी फोन केला, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी कदम यांना विचारले. कार गौतमी पाटील हिच्या नावावर आहे. त्यात रिक्षाचालक सामाजी मरगळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघात प्रकरणी गौतमी पाटील हिला नोटीसही बजावली आहे.
गौतमी पाटीलच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धायरीमधील गारमळा येथील उज्वल दीप सोसायटीत राहणारा 44 वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.
रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय 32) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली.
या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नाही असा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला. या नातेवाईकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली. या वाहनात गौतमी पाटील होती की नव्हती, संबंधित चालकाला अटक करा, वाहन जप्त करा असं चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना सांगितले. त्याशिवाय रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च गौतमीला करायला लावा असंही पाटील यांनी म्हटलं.








