शिवसेनेचे बंडखोर आमदारांना तूर्तास महाराष्ट्रात न येण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0

मुंबई,दि.३०: शिवसेनेचे बंडखोर आमदारांना तूर्तास महाराष्ट्रात न येण्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधान सभेत बहुमत चाचणी होणार नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर असणारे आमदार अद्याप राज्यात आलेले नाहीत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर गोव्यामध्ये रात्री उशिरा हे बंडखोर आमदार दाखल झाले असले तरी त्यांनी महाराष्ट्रात येण्याची घाई करु नये असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील बातमी दिलीय. हा सल्ला देण्यामागील मुख्य कारण म्हणजे भाजपाने अद्याप पुढील नियोजन केलेलं नसून बंडखोर आमदारांनी थेट शपथविधीच्या दिवशी मुंबईत यावं अशी भाजपाची इच्छा आहे.

उद्धव ठाकरेंनी रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमत चाचणीसाठी मुंबईतील ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या जल्लोषानंतर हॉटेलबाहेर पडलेल्या चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्या (३० जून रोजी) मुंबईत येऊ नये असं आवाहन केलं आहे.

“जे (शिवसेनेचे बंडखोर आमदार) उद्या मुंबईत येणार आहेत त्यांना मी आवाहन करतो की उद्या त्यांनी येऊ नये. त्यांनी शपथविधी असेल त्या दिवशी यावं,” असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. शपथविधी कधी होईल यासंदर्भातील काही निर्णय झालेला नसल्याने चंद्रकांत पाटलांनी असला सल्ला बंडखोर आमदारांना दिल्याचे समजते.

“शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. “सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू,” असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here