Chandrkant Khaire: चंद्रकांत खैरे यांचा नितीन गडकरी यांच्याबाबत खळबळजनक दावा

Chandrakant Khaire: नितीन गडकरी हे भाजपमधील चांगले नेते आहेत

0

नागपूर,दि.२६: Chandrakant Khaire On Nitin Gadkari: चंद्रकांत खैरे यांनी नितीन गडकरी यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शिवगर्जना मोहिमेअंतर्गत नागपुरला आलेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव घेत खळबळजनक दावा केला आहे. गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत असून भविष्यात त्यांना आणखी बाजुला सारण्यात येईल, अशा त्यांच्या गटात अफवा आहेत, असे वक्तव्य खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

गडकरी यांना काम करू दिले जात नाही | Chandrakant Khaire On Nitin Gadkari

नितीन गडकरी हे भाजपमधील चांगले नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची कामे करणारे ते एकमेव मंत्री होते. मात्र त्यांना काम करू दिले जात नाही. त्यामुळे मराठवाड्यातील साडेसतरा हजार कोटींची कामे त्यांना करू दिली गेली नाही व त्यातून मराठवाड्याचे नुकसान झाले. संघ परिवार असल्याने गडकरी यांना पूर्णत: बाजूला करण्यात आलेले नाही. गडकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटत असतात व फोनवरदेखील ते बोलत असतात, असा दावा खैरे यांनी केला.

भाजपकडून भीमशक्ती व शिवशक्तीत भांडणे लावण्याचे प्रयत्न

मुस्लिम समाज व वंचित आघाडीदेखील शिवसेनेकडे वळायला लागले आहेत. भाजपकडून भीमशक्ती व शिवशक्तीत भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही घाबरणार नाही. भाजप कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्यास मागेपुढे पाहत नाही, असा आरोप खैरे यांनी लावला.

एमआयएम ही भाजपचीच ‘टीम बी’

खैरे यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. अनेक मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. एमआयएम ही भाजपचीच ‘टीम बी’ आहे. ओवैसींना भाजपच मांडीवर घेत आहे. आमच्याबद्दल बोलताना बावनकुळे यांनी तोंड सांभाळून बोलावे, असे खैरे म्हणाले.

मराठी माणसाने शिवसेना फोडल्याचे दु:ख आहे

भाजपने राज्यात नीच राजकारण केले आहे. ईडी, नोटीसा व त्रास देऊन भाजपने आमच्यातील काही गद्दारांना वेगळे केले. उद्धव ठाकरे आजारी असताना गैरफायदा घेत भाजपने आपली चूल पेटविली. घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील शिवसेनेला धोका दिला. ते आनंद दिघे यांचे नाव घेतात, मात्र दिघेंनी असे कधीच केले नव्हते. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ते कोणत्याही शिवसैनिक व जनतेला आवडलेले नाही. शिवसेनेची क्रेझ आजदेखील कामय आहे. परंतु मराठी माणसाने शिवसेना फोडल्याचे दु:ख आहे, अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here